नेहमीप्रमाणे बुलडाणा बसस्थानकातून अकोल्याकडे जाणारी एसटी बस क्रमांक एम.एच. ४० वाय, ५२६४ ही बस बुलडाणा बसस्थानकात उभी होती. अकोला जाणारे एक-एक प्रवासी या बसमध्ये चढत होते. जवळपास ४० ते ४५ प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजता गाडी अकोल्याकडे आगेकूच करणार होती. मात्र, याचवेळी या बसमधील वाहकच दिसेनासे झाले. काही काळ वाट पाहूनही ते परत न आल्याने चालकाने एक-दोन वेळा हॉर्नही वाजविला. मात्र, वाहकाच्या कानापर्यंत तो पोहोचू शकला नाही. सव्वानऊचे साडेनऊ झाले; परंतु वाहक काही गाडीत परत येईना. शेवटी चालक बस सुरू ठेवून वाहकाला शोधण्यासाठी खाली उतरले. आधी चौकशी कक्षात चौकशी केली. नंतर कॅन्टिगमध्ये आणि त्यानंतर शौचालयाकडेही जाऊन आले. मात्र, वाहक काही सापडेना. शेवटी चालकाच्या सोबतीला बसमधील प्रवासीही खाली उतरले आणि वाहकाला शोधू लागले. यादरम्यान वेळ पुढे सरकरून पावणे दहापर्यंत जाऊन पोहोचली होती.
...अन् वाहक सापडले
चालक आणि प्रवासी यांनी चालविलेल्या शोधमोहिमेला अखेर यश आले. बस क्रमांक एम.एच. ४० वाय, ५२६४ चे वाहक दुसऱ्याच अकोल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलेले होते चालकाची वाट पाहत. त्यांनी त्या बसमधील प्रवाशांचे तिकिटेही फाडली होती. ‘ही गाडी आपली नाही’ असे चालकांनी त्यांना सांगून मूळ एसटी बसमध्ये आणल्यानंतर अखेर वाहक सापडले म्हणून प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. वाहक बसमध्ये परतल्यानंतर मात्र, एकच हशा पिकला होता.