लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा ते वरवंड फाट्यापर्यंत एनएच ७५३ ई या महामार्गाचे विस्तारीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम नव्याने सुधारित करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवा सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत नमूद केले की, महामार्गाचे काम करताना सुंदरखेडनजीक रस्त्यालगत १० ते १५ फूट खोल नाली खोदण्यात आली. या नालीतील मातीमिश्रीत मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. त्यानंतर नालीत माती टाकून बुजविल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून शासकीय महसूल बुडविला जात आहे. त्यामुळे रस्ता कामासाठी वापरण्यात आलेल्या मुरुमाचे मोजमाप करण्यात यावे. कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करीत रॉयल्टी भरून घेण्यात यावी, असेही तक्रारीत नमूद केले आहे.