सिंदखेडराजातही गाेंधळ
सिंदखेडराजा : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर मंगळवारी लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्या काही अतिउत्साही नागरिकांनी गोंधळ घातला. तीन दिवसांपासून लस नसल्याने येथील लसीकरण बंद होते. मंगळवारी दुपारी १ वाजता येथील केंद्रावर लस उपलब्ध होताच अनेकांना याची माहिती मिळाली आणि अवघ्या अर्ध्या तासात केंद्रावर शेकडोंनी गर्दी केली.
या केंद्रावर शहरातील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जात असली तरीही ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने लोक येथे आल्याने एकच गोंधळ उडाला. गैरसमज वाढल्याने आणि त्यातच आपलाही नंबर लागावा यासाठी लोकांनी लावलेल्या रांगा मोडून मुख्य दरवाजाजवळ गोंधळ घातला. यात दरवाजाच्या काचा फुटल्याने अखेर आरोग्य व्यवस्थेने पोलिसांना पाचारण केले. पोलीस आल्यावर गर्दीचा गोंधळ कमी झाला. मंगळवारी दिवसभरात दोनशेपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले.
नागरिकांनी गोंधळ करू नये, लस सर्वांना मिळणार आहे. मात्र जसा पुरवठा होईल तसे लसीकरण करण्यात येणार आहे. लोकांनी विनाकारण केंद्रावर गोंधळ करू नये, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार यांनी केले आहे.