काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:12 PM2019-05-20T12:12:48+5:302019-05-20T12:13:25+5:30
संग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. तामगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. संग्रामपूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळ असल्याने बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. यावर राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात न आल्याने येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने येथील बागायत क्षेत्र तथा फळबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणा हवेत विरल्याने येथील शेतकरी देशोधडीला टेकला. शेतकऱ्यांनी पीक विमा काढून सुद्धा त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. शेतकर्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध होत नाही. रासायनिक खते बियाणे यांचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला. अशा विविध मागण्यांचे निवेदन १५ मे रोजी संग्रामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. दुष्काळावर उपाययोजना करा तसेच तालुक्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय योजना राबवून तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आजतागायत राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत केली नाही. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कोट्यवधीचा खर्च करण्यात आला परंतु बहुतांश गावांमध्ये येथील पाणी पोहोचलेच नाही. जल युक्त शिवार योजना नावापुरती उरली असून प्रत्यक्षात याचा फायदा झाला नाही. दुष्काळग्रस्त भागात उपाय योजना राबवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने सोमवारी तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक होत रस्त्यावर उतरली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धा तास रस्ता रोखून धरला त्यावेळी तामगाव पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. या आंदोलनात संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, मनोहरराव बोराखडे, संजय ढगे, संतोष राजनकर, सै आसिफ, हरिभाऊ राजनकार, सुरेश हागे, प्रकाश देशमुख, तेजराव मारोडे, प्रशांत गिरी, एकनाथ इलामे, अरुण निंबाेळकार , रमेश इलामे आदींचा सहभाग होता.