बुलडाणा : कर्जमाफीच्या मुद्यावरुन बुधवारी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यामुळे एक काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजपच्या श्वेता महाले यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात कॉग्रेस पक्षातर्फे राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात बुधवारी बुलडाण्यातून झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या तयारीत असतानाच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, तालुकाध्यक्ष मोहन पवार, शहराध्यक्षा विजया राठी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर दाखल झाले. या कायकर्त्यांंनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रचंड घोषणाबाजी करुन प्रत्युत्तर दिले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच लोटपोट झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस कार्यकर्ता कलीम काझी हे लाठीहल्ल्यात किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार सपकाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखलजि. प. सभापती श्वेता महाले यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि. प. सदस्य रिझवान सौदागर, नगरसेवक जाकीर कुरेशी, बबलू मावतवाल यांच्याविरूद्ध कलम ३२३, २९४, १४३, १४७, ४२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.काँग्रेसची तक्रार; श्वेता महाले यांच्यावर गुन्हे दाखल काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील तायडे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार जि.प.सभापती श्वेता महाले, विजया राठी आदी भाजपा कार्यकर्त्यांवर कलम ३२३, २९४, १४३, १४७, ४२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.