खामगाव, दि. २७- खामगाव आणि शेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस-भारिप बहुजन महासंघाची आघाडी झाली असून, गुरुवारी जळगाव जामोदमध्येही या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ११ नगर परिषदांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. २४ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंंत नामांकन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. दरम्यान भाजप- शिवसेना युतीबाबत आणि काँग्रेस-भारिप आघाडीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय पक्षाने बरेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवारदेखील जाहीर केलेले नाही त. तथापि काँग्रेस आणि भारिप- बहुजन महासंघाने खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत किंवा जागेबाबत याठिकाणी अद्याप निर्णय झालेला नाही. खामगावनंतर शेगाव नगर परिषदेतही भारिप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. गुरुवारी जळगाव जामोद नगर परिषदेमध्येही भारिप-काँग्रेसची आघाडी झाल्याचे जाहीर झाले आहे. घाटाखालील पाच नगर परिषदांपैकी तीन नगर परिषदेमध्ये काँग्रेस-भारिप आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविणार असल्याने भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढल्यास त्यांना या आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.
जळगावातही काँग्रेस- भारिपची आघाडी
By admin | Published: October 28, 2016 2:37 AM