लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली असून, भाजपा सरकारने जीवनावश्यक वस्तुंसह पेट्रोल, डीझलमध्ये केलेल्या भाववाढीच्या विरोधात जिल्ह्यातील ९ तालुक्यात सोमवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. घाटावर बुलडाणा, मोताळा, देऊळगाव राजा तालुका वगळता चिखली, लोणार, सिंदखेड राजा व मेहकर येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. चिखली येथे बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. लोणार येथे जि.प.सदस्य राजेश मापारी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. सिंदखेड राजा येथे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर मेहकर येथे श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. घाटाखालील शेगाव तालुका वगळता खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव व नांदुरा तालुक्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. संग्रामपूर तालुक्यात तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बलदेवराव चोपडे व तालुका अध्यक्ष भगवान धांडे यांच्या नेतृत्वात नांदुरा येथे तहसीलवर मोर्चा निघाला. स्थानिक कॉटन मार्केटमधून या बैलगाडी मोर्चाला सुरुवात झाली. जळगाव जामोद तालुक्यात शहराच्या मुख्य मार्गाने मोर्चा तहसीलवर धडकला. यामध्ये प्रसेनजित पाटील, डॉ. स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला होता.
चिखली : पेट्रोल, डीझेल दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा!पेट्रोल, डीझल व गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासह इंधन दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात ५ फेब्रुवारी रोजी चिखली तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवित विद्यमान भाजपा सरकारने पेट्रोल व डीझलचे भाव वाढविण्याचे काम गेली वर्षभर सुरू ठेवले आहे. गत सहा महिन्यातील सर्वोच्च भाव पातळीवर पेट्रोल, डीझेलचे पोहोचले आहे., तर घरगुती गॅस सिलिंडर आजच्या सार्वाधिक किमतीवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासह इंधन दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी जाहीर केल्यानुसार चिखली तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात स्थानिक तालुका क्रीडा संकुलापासून तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला होता. या मोर्चात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून, पेट्रोल व डीझल दरवाढीचा निषेध नोंदविण्यासह इतर जीवनाश्यक वस्तुंच्या भाववाढीकडे लक्ष वेधण्यात आले, तर सरकार विरोधात नारेबाजीने परिसर दणाणून गेला होता. क्रीडा संकुल ते बस स्टॅण्ड, शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चौक, स्वस्तिक चौक, सिमेंट रोड, बैलजोडी मार्गे तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन जाचक भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, रमेश सुरडकर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स.सभापती संगीता पांढरे, ज्ञानेश्वर सुरूशे, अशोकराव पडघान, संजय पांढरे, सुधाकर धमक, दीपक देशमाने, सरपंच रिजवान सौदागर, महेंद्र बोर्डे, नंदु शिंदे, डॉ. इसरार, नगरसेवक अ.रफिक, मो.आसिफ, दीपक खरात, गोकुळ शिंगणे, अ.रउफ, किशोर कदम, तुषार बोंद्रे, विलास चव्हाण, तुषार भावसार आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणार : बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणीकेंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकर्यासह सायकली व बैलगाडीसह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. प्रारंभी नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी बैलगाडी मोर्चाला हिरवी झेंडी देताच निघालेल्या मोर्चामध्ये तालुक्यातील पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील झाले. उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना जि.प.सदस्य राजेश मापारी म्हणाले की, प्रशासन शेतकर्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, तसेच सत्ताधार्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांशी देणे घेणे नाही. शेतकर्यांचे, जनसामान्यांचे प्रश्न सोडविले गेले नाही, तर आंदोलन करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादल सचिव प्रकाश धुमाळ, नितीन शिंदे, जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, बादशहा खान, आरोग्य सभापती शेख समद शेख अहमद, नगरसेवक प्रा.सुदन कांबळे, पंढरी चाटे, नगरसेवक प्रा. गजानन खरात, प्रताप सरदार, एजाज खान, सतीश राठोड, शेख असलम, सुमन डोईफोडे , सीमा वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी हजर होते.
दोन कि.मीपर्यंत बैलगाडीची रांगलोणार तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील शेतकर्यांचा लक्षवेधी सहभाग होता. प्रथमच कॉंग्रेसच्यावतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा निघाल्याने त्यात पदाधिकारी, कार्यकत्यार्ंसह शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी होते. यामुळे शहरात २ कि.मी. पयर्ंत बैलगाड्यांची रांग लागली होती. यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तर रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.
सिंदखेडराजा : मोर्चात शेतकर्यांचा उत्स्फूर्त सहभागभाजपा प्रणित केंद्र व राज्य सरकारने भारतीय जनतेचा भ्रमनिरास केला असून, दिवसेंदिवस पेट्रोल, डीझल, स्वयंपाकाचा गॅस व सर्वच जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ या विरोधात सिंदखेडराजा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर शेतकर्यांसह बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकर्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. सदर मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार संतोष कनसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जगनराव ठाकरे, काँग्रेस नेते महेश जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवदास रिंढे, बद्रीभाऊ वाघ, कचरू भारस्कर, रमेश कायंदे, शे.मन्नान, उमेश इंगळे, शहाजी चौधरी, गणेश झोरे, संजय चौधरी, संजय जायभाये, शिवानंद मुंदे, सुभाष इंगोले यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.