मलकापूर : शहरातील वीज समस्येबाबत न.प. आरोग्य सभापती राजू पाटील यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयावर धडक देण्यात आली. तत्पूर्वी गांधी चौक स्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील साहित्य बाहेर काढून तोडफोड करण्यात आली, तसेच सदर कार्यालयाला तालादेखील ठोकण्यात आला .मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या दरम्यान शहरात कुठेही वीज पुरवठा करू नये, अशी मागणी भाराकाँच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीला जणू वीज वितरण कंपनीने केराचीच टोपली दाखवित वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरूच ठेवला. या प्रकाराबाबत गांधी चौक स्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारी दाखल करूनही तत्काळ कारवाईच्या दिशेने पाऊले उचलल्या जात नव्हती. या प्रकाराला कंटाळून जुन्या गावातील तरूण, नागरिक व महिलांनी शुक्रवारी दुपारी भाराकाँ शहराध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत कंपनीचे अभियंता बी.एफ.पवार यांच्या कक्षातील ट्युबलाइट व पंखे बंद करून त्यांना अंधाराचा त्रास कसा होतो, याचा जाब विचारला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, नागरिकांना शांत करीत माजी नगराध्यक्ष अॅड.मजीद कुरेशी, नगरसेवक अॅड.जावेद कुरेशी, जाकीर मेमन, अॅड.नावेद खान, इम्रान मेमन, अरूण गवात्रे, फिरोज खान, कलीम पटेल, पत्रकार मनोज पाटील, विनायक तळेकर आदींनी अभियंता पवार यांच्याशी चर्चा करून खंडित झालेला वीज पुरवठा हा तत्काळ सुरू करा व त्याकरिता लागणारी त्या क्षमतेची विद्युत वाहिनी त्याठिकाणी बसवून द्या या मागणीला अभियंता पवार यांनी दुजोरा देत त्यादृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ योग्य ते आदेश व सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्यास जुन्या गावात पाठविले.
वीज समस्येबाबत काँग्रेसची धडक मोहीम
By admin | Published: June 17, 2017 12:19 AM