खामगाव : काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पालिका सभेतील गैर वर्तनामुळे पदावरून दूर करण्यासाठी बुधवारी पालिका सभागृहात खास सभा पार पडली. या सभेत काँग्रेसच्या सर्वच १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बहुमताने ठराव संमत करण्यात आला. या ठरावाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्य या ठरावावरून समोरा-समोर भिडले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.नगर परिषदेच्या सभांमध्ये वारंवार गोंधळ तसेच सभेची नोटीस वेळेत पाठविल्यानंतर ती न घेता वेळेवर मिळाली नसल्याचे सांगुन काही नगरसेवकांकडून गैरवर्तन होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांनी ३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बुधवारी या नगरसेवकांच्या अपात्र ठरविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (३) अन्वये शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांच्या सभेतील गैर वर्तनावर सत्ताधाºयांनी बहुमताने शिक्कामोर्तब केला. यावेळी २० विरुध्द ११ अशा बहुमताने काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा अपात्रता प्रस्ताव मंजूर झाला. तर भारिप बहुजन महासंघाचे नगरसेवक विजय वानखडे या सभेला अनुपस्थित होते. सोबतच भाजप समर्थित एक अपक्ष नगरसेविकेचीही यावेळी अनुपस्थिती होती. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अनिताताई डवरे, मुख्याधिकारी धंनजय बोरीकर, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या नगरसेवकांविरोधात घेण्यात आला ठराव!पालिका सभेत गैर वर्तणुकीचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक अमेय राजेंद्र सानंदा, प्रविण कदम, भुषण शिंदे, इब्राहीम खान सुभान खान, शीतल माळवंदे, संगीता पाटील, शे.फारूक बिस्मील्ला, शे.रिहानाबानो महेबुब, अ.रशिद अ.लतीफ, अलकाबाई सानंदा या ११ नगरसेवकांसह स्वीकृत नगरसेविका सरस्वतीताई खासणे यांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेच्या खास सभेत बहुमताने ठराव संमत करण्यात आला.
काँग्रेस नगरसेवकांकडून निषेध! नगरसेवक अपात्रता प्रकरणी मंजूर करण्यात आलेल्या ठरावासोबतच सत्ताधाºयांच्या मनमानी कृतीचा काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र निषेध नोंदविला. पालिकेची खास सभा संपताच प्रवेशद्वारावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र निर्दशने केली. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी समर्थन दिले. त्याचवेळी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या भारिप नगरसेवक विजय वानखडे यांची यावेळी आणि सभेला अनुपस्थिती होती.