चिखली : पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात १२ जुलै रोजी चिखली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शहरात सायकल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप सरकारने महागाई भरमसाट वाढविली असून कोरोनाकाळात अगोदरच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घालत असल्याचा आरोप या वेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १२ जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांच्या नेतृत्वात शहरातून सायकल मोर्चा काढून वाढत्या महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या सायकल मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, बाळू साळोख, संजय गिरी, रूपराव म्हस्के यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, प्रदीप अंभोरे, ज्ञानेश्वर सुरूशे, डॉ. अमोल लहाने, सचिन बोंद्रे, अॅड. प्रशांत देशमुख, डॉ. म. इसरार, मो. आसीफ मो. शरीफ, रफिक कुरेशी, अमीनखाँ उस्मानखाँ, रामदास मोरे, हाजी रऊफबाबू, किशोर कदम, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे, समाधान गीते, शहेजाद अली, पप्पू जागृत, दत्ता करवंदे, बळीराम हाडे, जितेंद्र राजपूत आदींसह बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारविराेधात दिल्या घाेषणा
मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेला हा सायकल मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांहून होत बसस्थानक परिसरातून परत काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात त्याचा समारोप झाला.