चिखली : मनुवादी विचारधारेचे लोक नागरिकांवर दडपण आणण्याचे व लोकशाही खिळखिळी करण्याचे कार्य करीत आहेत. याच विचाराच्या संघटनांनी त्या काळात इंग्रजांना मदत केली होती व आजही देशाचे स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मुळावर घाव घालीत आहे. लोकशाही कमकुवत झाली तर, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाईल, म्हणून स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकविण्याचे काम काँग्रेसला करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य देखील काँग्रेसमुळेच मिळाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
चिखली शहर व युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक जयस्तंभ चौकात ९ ऑगस्ट क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मशाल रॅलीचे आयोजन केले होते, यावेळी राहुल बोंद्रे बोलत होते. कार्यक्रमाला शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, युकाँ शहराध्यक्ष निखली जागृत, प्रदीप पचेरवाल, सचिन बोंद्रे, डॉ. इसरार, नगरसेवक हाजी राउफ, दीपक खरात, राजू रज्जाक, गोकुळ शिंगणे, विजय गाडेकर, राहुल सवडतकर, नीलेश अंजनकर, अॅड. प्रशांत देशमुख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मशाली पेटवून स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.