लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : गेल्या १७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असताना मुकुल वासनिक यांच्यामुळे आपणास ग्रामविकासाशी संबंधित काही पदे मिळाली; मात्र २0१२ पासून आपणांस बाजूला सारण्यात आले आणि कायमच आपला शब्द डावलण्याचा चंग काही लोकांनी बांधला. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये काही काळापासून घुसमट होत होती. हे वास्तव आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष व्यक्तिकेंद्रित झाला असून, सर्वच पदे एकाच व्यक्तिकडे किंवा त्यांच्या निर्देशानुसार वाटली जात आहेत. त्यामुळे ही घुसमट टाळण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे जे बाळकडू मिळाले त्यातूनच आपण काँग्रेसचा त्याग करून आपल्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत प्रवेश घेतला, असे स्पष्टीकरण प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.१२ फेब्रुवारीला मुंबईत शिवसेना भवनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रा.नरेंद्र खेडेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रा. खेडेकर यांच्या निवासस्थानी १४ फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख सिद्धुसिंग राजपूत, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, शिवराणा मित्रमंडळाचे o्रीकिसन धोंडगे, विलास सुरडकर, रामकृष्ण आंभोरे यांची उपस्थिती होती. प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी मार्च २0१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपण थांबण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र ज्या गटातून मी तीन वेळेस निवडून आलो, त्या गटाचा उमेदवार ठरविताना मला विश्वासात घेण्यात आले नाही, तसेच माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही. सातत्याने मला डावलण्याचा आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. मतदार संघाचा चौफेर विकास केल्याचा आ.राहुल बोंद्रे यांचा दावा फोल असल्याचा आरोप करून केवळ जेसीबीने नद्या खोदणे म्हणजे विकास नाही. चिखली मतदार संघात आजवर कोणताही शाश्वत विकास झालेलाच नाही, असा आरोप करीत विकासाची व्याख्याच या मंडळींनी बदलून टाकली असल्याचे ते म्हणाले. आ.राहुल बोंद्रे यांच्याकडे असलेले जिल्हा बँकेचे कर्ज त्यांनी तत्काळ परत दिलेच पाहिजे; मात्र ही मागणी जो कोणी करतो त्याला प्रत्युत्तर देताना ते इतरांकडेही कर्ज बाकी असल्याचे दाखले देतात. प्रा. खेडेकर यांनी आ. बोंद्रेंना आव्हान देताना माझ्याकडील कोणतेही कर्ज (असल्यास) मी २४ तासांत भरतो, तुमच्याकडील कर्ज २४ दिवसांत भरा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आता जिल्हय़ात आणि चिखली मतदार संघात शिवसेनेचा झंझावात निर्माण करणार. गारपिटीचे तत्काळ सर्वेक्षण व्हावे आणि शेतकर्यांना भरघोस मदत द्यावी. बुधवत यांनी प्रा.नरेंद्र खेडेकरांच्या शिवसेनेतील घरवापसीमुळे पक्षाला बळकटी आली असून, येत्या काळात जिल्हय़ात आणि चिखली मतदार संघात घराघरात शिवसेनेचा भगवा पोहोचविणार असून, चिखली मतदार संघासह जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात आणि लोकसभा मतदार संघात भगवा फडकविणारच, असा निश्चय व्यक्त केला.
चिखलीत काँग्रेस व्यक्तिकेंद्रित झाल्याने भ्रमनिरास झाला - नरेंद्र खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:34 AM