मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे सोमवारी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 03:54 PM2019-01-25T15:54:42+5:302019-01-25T15:55:16+5:30
बुलडाणा: मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आक्रमक झाला असून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारीला धरणे देण्यात येणार आहे.
बुलडाणा: मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आक्रमक झाला असून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारीला धरणे देण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील मुस्लीम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्र यांनी केले आहे. प्रदीर्घ कालावधीपासून मुस्लीम आरक्षणाची मागणी धुळखात पडली आहे. केवळ आश्वासन दिल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण त्वरेने देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे देण्यात येईल. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नदीम जावेद (जोनपूर, उत्तर प्रदेश), विधान परिषदेचे आ. डॉ. वजाहद मिर्झा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुस्लीम समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाबेतच समतोल विकास साधण्यासाठी मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने राज्य व केंद्र सरकारपर्र्यंत मुस्लीम समाजाचा आवाज पोहोचविण्यासाठी हे धरणे आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात मुस्लीम समाज बांधवांसह जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारी, पक्षनेते, प्रदेश प्रतिनिधी, आजी, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केले आहे.