बुलडाणा : केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. अर्थव्यवस्था, कोरोनो महामारीशी लढा, वाढती महागाई, सतत वाढणारे डिझेल-पेट्रोलचे दर, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आंदोलन, अशा सर्व आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आराेप करीत काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला़ यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. सात प्रतीकात्मक मडकी यावेळी फाेडण्यात आली़, तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़
२०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध सोशल मीडिया, मीडियाच्या माध्यमातून जनतेला भूलथापा दिल्या. अच्छे दिन आयेंगे; परंतु अच्छे दिन तर आलेच नाहीत, उलट बुरे दिन आले म्हणून आता जनता टाहो फोडत आहे, असा आराेप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला़ पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर गॅसचे भावदेखील ९०० पर्यंत गेले आहेत. जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यावर पेट्रोल-डिझेल भाववाढीचा परिणाम झाला आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले आहे, असा आराेप करीत यावेळी सरकारविराेधी घाेषणा देण्यात आल्या़
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड , प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते ॲड. बाबासाहेब भोंडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ॲड. जयश्री शेळके, सभापती पंचायत समिती बुलडाणा उषा चाटे, संगीता गाडेकर, विद्या देशमाने, अनिता घुगे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश खेडकर, राजेश मापारी, डाॅ़ इसरार जमादार, ॲड. अमर पाचपोर, सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, गणेश पाटील, संजय पांढरे, रमेश कायंदे, श्याम राठी, नीलेश पाउलझगरे, साहेबराव पाटोळे, प्रा. गजानन खरात आदींसह इतर उपस्थित हाेते़