मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, या सर्वेक्षणातही भेदभाव होत असल्याची ओरड आहे. त्यातच या पावसादरम्यान ३५७ घरांची पडझड होऊन काही ठिकाणी अंशत:, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासकीय नियमानुसार अशा स्थितीत आपद्ग्रस्तांना तातडीने अल्प स्वरूपात आर्थिक मदत अर्थात सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, दहा दिवसांनंतरही मोताळा तहसील कार्यालयाकडून याबाबत हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या काही आपद्ग्रस्तांसह काँग्रेसचे माजी आ. तरा, काँग्रेसच्या राज्य शिस्त भंग कृती समितीचे सदस्य हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, महेंद्र गवई, प्रकाश बस्सी, नानाभाऊ देशमुख, गजानन मामलकर, सचिन महाजन, कृष्णा खराटे, सुकलाल पाटील, बाळूभाऊ खाकरे, प्रदीप जैन यांच्यासह अन्य नागरिकांनी मोताळा तहसील कार्यालय गाठले व तेथेच ठिय्या आंदोलन केले.
--२४ तासात मदत देणार--
काँग्रेस आमदार व कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महसूल प्रशासनात धावपळ झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी भ्रमनध्वनीवर चर्चा केली. मदत त्वरित देण्याचे आश्वासनही दिले. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी निर्णयावर ठाम होते. शेवटी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आपद्ग्रस्तांना २४ तासांत सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन सपकाळ यांना दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.