लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या फसव्या शेतकरी कर्जमाफीविरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर एल्गार पुकारणार आहे. प्रदेषाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत १२ जुलै रोजी बुलडाण्यातून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आमदार राहुल बोंदे यांनी नमूद केले आहे, की सरसकट शेतकरी कर्जमाफी व्हावी, यासाठी काँग्रेसने आंदोलन छेडल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला. काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून इतर पक्ष व संघटनांनीदेखील कर्जमाफी आंदोलनात उडी घेतली. मात्र, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न शासनाने केला. यातून भाजप सरकार शेतकरीविरोधात आहे, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनात शेतकरी व इतर संघटना अधिक जोमाने आंदोलनात उतरल्याने ११ जून रोजी सरकार शेतकऱ्यांपुढे नमले. उच्चस्तरीय मंत्री गटाने तत्त्वत: सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्याचवेळी शेतकऱ्यांना १० हजारांची उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठीदेखील अनेक जाचक अटी घातल्या. त्या विरोधात काँग्रेस पक्षाने शेतकरी हितासाठी विरोधक म्हणून ठाम भूमिका घेतली. त्यामुळे शासनाने या जाचक अटी मागे घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी १०८२ शेतकऱ्यांना १० हजारांची उचल मिळाली आहे. सरकारच्या या घोषणेतील फोलपणा काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम उघड करुन महाराष्ट्रापुढे मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करत दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे सांगत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देत असल्याचे जाहीर केले. या माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असे सांगण्यात आले. तसेच दीड लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यातील कमीत कमी रक्कम देण्यात येईल, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २५ हजार किंवा कर्जाच्या २५ टक्के या पैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल, असे जाहीर केले. पण, सरकारने दिलेले आकडे फसवे असल्याचे सांगत, आ. राहुल बोंद्रे म्हणाले, सरकारची कर्जमाफी फक्त २०१२ ते २०१६ या ४ वर्षासाठी असून, ही कर्जमाफी ३४ हजार कोटी नाही, तर ५ हजार कोटींचीच आहे. याद्वारे ८९ लाख नाही तर फक्त १५ लाखांपेक्षा कमी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, ४० लाख नाही, तर फक्त ४.५ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात काँग्रेस १२ जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडणार आहे. बुलडाण्यातील आंदोलनाच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण जी. एस. टी. बाबत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल व्यापारी व मेडिकलच्या असोसिएशनबरोबर चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे - आ. बोंद्रेआंदोलनात अ.भा. कॉ.क.चे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
फसव्या कर्जमाफीविरोधात काँग्रेसचा एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 12:56 AM