- अनिल गवई
खामगाव: जिल्ह्यात ‘झळाळी’च्या प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेस पक्षाला अंतर्गत गटबाजीची ‘वाळवी’पोखरत असल्याचे दिसून येते. युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत शह-काटशहाच्या राजकारणात काँग्रेसचे ‘तेज’ झाकोळल्या गेल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.
भारतीय राष्ट्रीय युवक कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणूक ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान, जिल्ह्यात पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने वर्चस्व सिध्द करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली. शह-काटशहाचे राजकारणही यावेळी रंगल्याचे दिसून आले. निवडणूक निमित्ताने जिल्ह्यात गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षात प्रचंड उलथा-पालथ झाली. जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया युवक काँग्रेसच्या बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदाकरीता विद्यमान जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे आणि काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांच्या पत्नी राजकुमारी चौहान यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीचे निकाल शुक्रवार १४ सप्टेंबर रोजी जाहीर झालेत. यामध्ये कायंदे यांनी राजकुमारी चौहान यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. मनोज कायंदे यांनी घेतलेली २०९५ मते शक्तीप्रदर्शनाची एकजूट दर्शविणारी ठरत आहेत. तर राजकुमारी चौहान यांना मिळालेली १०२२ मते काँग्रेस पक्षाचे ‘तेज’ झाकोळणारी ठरताहेत. राजकुमारी चव्हाण यांचा एक हजारावर मतांनी परभाव करीत कायंदे दुसºयांदा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनले. निवडणुकीत कायदे यांचे पारडे सुरूवातीलपासूनच जड मानले जात होते. त्यामुळेच राजकुमारी चौहान यांचा पराभव निश्चित मानला जात होता. तरीही त्यांनी दिलेली एकाकी झुंज चर्चेचा विषय बनली आहे. या निवडणुकीत खामगाव विधानसभा मतदार संघातील अंकितकुमार दोडे बुलडाणा लोकसभा उपाध्यक्षपदाकरीता विजयी झाले. तर लोकसभा महासचिव पदाकरीता जुनेद मुल्लाजी ५८३ मते घेत विजयी झाले. तर तुषार चंदेल २१४ मते मिळवुन विजयी झाले. तसेच सौ.शिल्पा अनंत गावंडे यांची जिल्हा सचिवपदाकरीता निवड झाली.
वर्चस्वासाठी नेत्यांमध्ये ‘लढाई’!
युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीवरून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगली. यामध्ये प्रामुख्याने खामगाव मतदार संघात तेजेंद्रसिंह चौहान आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा समोरा-समोर उभे ठाकले. दोन राणांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगत असताना, काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांनी वरिष्ठांचा आदेश पाळण्यात धन्यता मानली. निवडणूक निकालानंतर दिलीपकुमार सानंदा ‘बाजीगर’ ठरले. तर पिंपळगाव राजा येथील जुनेद मुल्लाजी यांना जिल्ह्यात दुसºया क्रमांकाची मते मिळाल्याने, धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाला झळाली मिळाली. त्याचवेळी तेजेंद्रसिंह चौहान यांना धक्का बसला. दिलीपकुमार सानंदा यांना खामगाव मतदार संघातून चौहान यांनी थेट आव्हान उभं केले. आकडेवारीच्या बेरजेत चौहान यांचा पराभव झाला असला तरी, चौहान ‘विरोधा’चे जाळे विणण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आता मतदार संघात होत आहे.
विजयी झालेल्यांचे नेत्यांच्या एकजुटीला श्रेय!युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाºयांनी आपल्या विजयाचे श्रेय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, धनंजय देशमुख, मुख्यत्यारसिंह राजपूत यांना दिले.