- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवणूक केलेला रेशनचा तांदूळ जप्ती प्रकरणाचे गावोगावी कनेक्शन जुळत आहे. त्यामुळे पोलिसांनीही आपली तपासचक्रे ग्रामीण भागाच्या दिशेने फिरविली आहेत. काळ्या बाजारात धान्य विक्री करणारे पुरवठा विभागासोबतच पोलिसांच्याही रडारवर आहेत. आरोपींनी ज्यांच्याकडून तांदूळ खरेदी केला त्या शिधापत्रिकाधारकांवरही कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे.लॉकडऊनच्या काळात जादा दराने धान्य विक्री, मालाची साठवणूक असे काही गैरप्रकार समोर आले आहेत. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील भादोला शिवारातील एका गोदामामधून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करून ठेवलेला रेशनचा ४६ क्विंटल १२ किलो तांदुळ ६ जून रोजी सायंकाळी पकडला. यामध्ये १ लाख ६२ हजार १८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना ८ जून रोजी एक दिवसावी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासाअंती आरोपीनी गावागावातून तांदूळ खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे गावागावाशी जुळलेले असल्याने पोलिस तपासही त्या दिशेने सुरू आहे. तहसील स्तरावरून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. कार्डधारकांकडून हा तांदूळ खरेदी केलेला असल्यास विक्रेत्यांवर या प्रकरणात कारवाई होऊ शकते.
आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता जप्त केलेला हा तांदूळ नेमका कोणाच्या हिश्श्याचा होता याचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे काळ्या बाजारात धान्य विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणे जसा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे कार्डधारकांनीही तो तांदूळ बाहेर कुठे विक्री करता येत नाही. यामध्ये रेशनचा तांदूळ विक्री करणारे कार्डधारकही दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होवू शकते.-गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी.
गावागावतून रेशनचा तांदूळ जमा करून त्याचा साठा केलेला होता. या प्रकरणात आणखी काही गुन्हेगार सापडू शकतात. त्या दिशेने तपास सुरू आहे.-सारंग नवलकार, पोलीस निरिक्षक, बुलडाणा.