केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
बुलडाणा: केंद्रीय कर्मचाऱ्यांना ११ टक्के महागाई भत्ता वाढ करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै २०२१ पासून होणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा होती.
पावसामुळे पिकांचे नुकसान
साखरखेर्डा: पावसामुळे लव्हाळा, साखरखेर्डा येथे पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाने ओढ्याचे पाणी खोळंबल्याने पिके उद्ध्वस्त झाली. आधीच दुबार पेरणी झाली असताना आता तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, त्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
दुबार पेरणी करणाऱ्यांना मदत द्या
बुलडाणा: खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची पुढील सर्व आर्थिक गणिते अवलंबून असतात. यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस यांसह इतर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला होता. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून, त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित
मेहकर : राज्य खासगी चतुर्थ श्रेणी जिल्हा कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी जिल्हाध्यक्ष रामेश्वर निकम, मोहन बोडखे, शहराध्यक्ष तुषार महालक्ष्मे यांनी केली आहे.
नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ
बुलडाणा: परिसरातील काही गावांमध्ये विद्युत पुरवठा बंद करण्यात येत असल्याने गावचा पाणीपुरवठाही खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.