बुलडाणा: बिल्डींग बायलॉज व अपार्टमेंटचे सर्व नियम पायदळी तुडवून सुंदरखेड ग्रामपंचायत क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या टोलेजंग इमारती कशा बेकायदेशीर आहेत, याचा अहवाल तांत्रिक अधिकार्यांनी देऊनही या इमारतीचे बांधकाम थांबविण्याऐवजी प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहे. या इमारतीच्या परिसरातील रहिवाशांच्या जीविताला केव्हाही धोका होऊ शकतो, ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड व सागवन ग्रामपंचायत हद्दीकडे सध्या शहरातील धनदांडग्यांनी लक्ष केंद्रित केले असून, या भागात आपार्टमेंट व व्यावसायिक प्रतिष्ठाने उभारण्याचा सपाटा लावला आहे. सध्या सुंदरखेड ग्रा.पं. हद्दीत १६ अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहेत. ऑगस्ट २0१२ ते जून २0१३ या कालावधीत एकूण १६ अपार्टमेंटच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना ग्रामपंचायतीने अटी व शर्तीची पूर्तता करून न घेता मोघमपणे परवानग्या दिल्या आहेत, तर संबंधित अपार्टमेंटच्या मालकांनीसुद्धा बिल्डींग बायलॉज आणि अपार्टमेंटचे सर्व नियम धाब्यावर ठेवून बांधकाम केले आहेत, त्यामुळे या परिसरात राहणार्या इतर नागरिकांना भविष्यात या इमारतीपासून धोका निर्माण होणार आहे, हे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद तळेकर, कमलेश चंदन, प्रा. सुनील देशमुख, डॉ. अनंत शिरसाट यांच्यासह परिसरातील १५0 नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. वारंवार तक्रारी केल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक अधिकार्याकडून या १६ इमारतीची मोका पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
नियम डावलून अपार्टमेंटचे बांधकाम
By admin | Published: January 03, 2015 12:58 AM