लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील नगर पालिकेच्या बांधकाम सभापतींनी आपल्या पदाचा ना‘राजीनामा’ नगराध्यक्ष अनिताताई डवरे यांच्याकडे सोमवारी सायंकाळी सोपविला. सभापतींच्या राजीनामा नाट्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्तापक्षाचाच एक स्वीकृत नगरसेवकही सभापतींच्या वाटेवर असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगर पालिकेचा नाव लौकीक आहे. या पालिकेत गेल्या वर्षभरापूर्वी ‘परिवर्तन’शील सत्ता पालट झाला आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी निर्विवाद बहुमत मिळविले आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात विषय समिती सभापतींची निवडणूक पार पडली. विषय सभापती निवडणूक होवून जेम-तेम अडीच-तीन महिन्यांच्या कालावधी लोटत नाही, तोच शोभाताई रोहणकार यांनी बांधकाम सभापतीपदाचा राजीनामा अध्यक्ष अनिताताई डवरे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला आहे. त्याचप्रमाणे सत्तापक्षाचाच एक स्वीकृत नगरसेवकही बांधकाम सभापतींच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, या नगरसेवकाला वरिष्ठांकडून सबुरीचा सल्ला देण्यात आला आल्याचे समजते. खामगाव पालिकेत सत्ताधारी भाजपचे दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यामुळे नेमका कोणता नगरसेवक राजीनाम्याच्या वाटेवर आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या राजीनामा नाट्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पक्ष श्रेष्ठींचा सबुरीचा सल्ला!
नाराजीवरून बांधकाम सभापती शोभाताई रोहणकार यांनी राजीनामा दिल्याने, पालिकेतील सत्ताधाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे नाराज असलेल्या स्वीकृत नगरसेवकाचीही मनधरणी पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. तसेच बांधकाम सभापती यांनाही सबुरीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे.