देऊळगाव राजा : शिक्षक मित्रमंडळातर्फे बाय-पॅप मशीन व तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत स्वॅब टेस्टिंगसाठी शेडची निर्मिती करण्यात आली आहे़
देऊळगाव राजा येथील प्राथमिक शिक्षक मित्रमंडळाने समर्पित कोविड रुग्णालयास मदत करण्याच्या उदात्त हेतूने निधी एकत्र करून ७० हजार रुपये किमतीचे एक बाय-पॅप मशीन २५ मे राेजी रुग्णालयास दिले. त्याचप्रमाणे तालुका पतसंस्थेच्या वतीने कोविड रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी साठ हजार रुपये खर्च करून शेडची निर्मिती केली. ती शेड कोविड रुग्णालयास समर्पित करण्यात आली. त्याचप्रमाणे शिक्षकांमार्फत अजूनही निधी जमा होत आहे आणि या जमा होत असलेल्या निधीमधून बाल कोविड रुग्णालय निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे मत गटशिक्षणाधिकारी मुसदवाले यांनी मांडले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मान्टे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आस्मा, देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष मारोती शिवरकर, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक उपस्थित होते.