लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात लाखो बांधकाम मजूर आहेत. संचारबंदीमुळे कामे ठप्प झाल्याने या बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाच्या दीड हजार रुपये मदतीची घोषणाही हवेतच विरली आहे.
गतवर्षी २३ मार्च रोजी कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. तेव्हापासून बांधकाम बंद झाले. सप्टेंबर २०२० पासून काही ठिकाणी बांधकाम सुरू झाले; मात्र तेही अत्यल्प होते. त्यानंतर एप्रिल २०२१ पासून पुन्हा लॉकडाऊन लागले. त्यामुळे गतवर्षापासून बांधकाम मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या बिल्डर व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडल्याने बांधकामे बंद आहेत. अनेक बांधकाम मजूर सकाळी घरातून डबा घेऊन शहरातील बाजारपेठेतील मुख्य ठिकाणी येतात. काम मिळाले नाही तर दिवसभर थांबून घराकडे जातात. सध्या संचारबंदी आहे. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत हे मजूर कामाच्या शोधासाठी भटकंती करतात. त्यात काहींच्याच हाताला काम मिळते, तर काहींना कामच मिळत नाही. हाताला काम नसल्याने या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने वाढीव मदत तत्काळ कामगारांच्या बँक खात्यावर टाकावी, अशी मागणी होत आहे.
संचारबंदीमुळे बहुतांश कामे ठप्प आहेत. कामाच्या शोधात भटकंती करावी लागते. शासनाने तोकडी मदत जाहीर केली आहे. त्यात जाहीर केलेली रक्कमही मिळालेली नाही. बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने वाढीव मदत द्यावी.
- शेख अकील,बांधकाम मजूर
मागील वर्षभरापासून बांधकाम मजुरांचे हाल होत आहेत. आठवड्यातून एखादा दिवस हाताला काम मिळते. त्या मजुरीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा, हाच प्रश्न आहे. शासकीय मदतीपासूनही बांधकाम मजूर वंचित राहत आहेत. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
- सैय्यद जाबीर, बांधकाम मजूर
बांधकाम मजुरांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. संचारबंदीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बांधकाम मजुरांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने वाढीव मदत देण्याची गरज आहे.
- गजानन वानखडे, बांधकाम मजूर
बांधकाम मजुरांचा एमआयडीसीत कामासाठी शोध
बांधकाम बंद असून, आगामी काहीकाळ सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे खामगाव शहर व तालुक्यातील मजूर एमआयडीसीमध्ये कामाचा शोध घेत आहेत. खामगाव एमआयडीसीत अनेक उद्योग आहेत. यापैकी काही उद्योग अजूनही सुरू आहेत. या कंपन्यांमध्ये परराज्यातील मजूर कामाला असतात. सध्या लॉकडाऊनमुळे हे मजूर घरी गेले असल्यामुळे त्यांच्या जागी बांधकाम मजूर काम करीत आहेत.