देऊळगाव राजा: जालना येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. त्या सहा जणांना देऊळगाव राजा येथे होम क्वारंटीन करण्यात आले आहे. त्यातील तीन रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. देऊळगाव राजा पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना शहरात अनेक रुग्ण उपचारासाठी ठराविक डॉक्टरांकडे नियमित जातात. सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून जालना शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. मागील चार दिवसापूर्वी जालना शहरातील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. जालना आरोग्य विभागाने त्या दोन डॉक्टरांनी तपासणी व उपचार केलेल्या रुग्णांची माहिती मिळवली, त्यामध्ये देऊळगाव राजा शहरातील सहा जणांचा समावेश आहे. जालना जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती कळवल्यानंतर देऊळगाव राजा शहरातील विविध भागात राहणाºया त्या सहा जणांशी स्थानिक आरोग्य विभागाने संपर्क साधून त्यांना होम क्वारंटीन केले. या सहा जणांमध्ये तीन रुग्ण गंभीर आजाराचे असुन त्यांचा समावेश हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आरोग्य विभागाने केला आहे. इतर तीन रुग्ण लो रिस्क संपर्कातील आहेत, त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. जालन्यात दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाल्याने या सहा रुग्णांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक आरोग्य विभागाकडे सुध्दा संपर्क केला होता, अशी माहिती समोर येत आहे. देऊळगाव राजा शहरात यापूर्वीही दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यापैकी एक रुग्ण हा राजस्थान येथुन परतला होता, तो पॉझिटिव्ह झाल्याने त्याला मलकापूर येथून आणण्यासाठी गेलेला वाहचालकही पॉझिटिव्ह आढळला होता. त्या दोघांवरही बुलडाण्यात उपचार झाले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर देऊळगाव राजा कोरोनामुक्त झाले असतानाच परत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात शहरातील सहा जण आल्याने शहर वासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालन्यातील डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हायरिस्क संपर्कातील आहेत. त्यांना बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठवले जाणार असून तीन रुग्ण लो रीस्क मधील आहेत, त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे.- डॉ. आसमा मुजावर, वैद्यकीय अधिकारी, देऊळगाव राजा