लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा व्यक्ती व कोरोना बाधित्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना अहवाल येईपर्यंत कोविड सेंटरमध्येच क्वॉंरंटीन केल्या जात असे. परंतु आता स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तींना घरीच कॉंरंटीन होण्यासाठी सांगितले जाते. संबंधित व्यक्ती या नियमाचे पालन करतो की नाही यावर पाळत ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. दोन-तीन दिवसानंतर जेव्हा संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. तेव्हा त्यांना बोलावून कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. परंतु त्या दोन तीन दिवसात तो व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे.ग्रामीण भागासह जळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने जनजीवन चिंताग्रस्त बनले आहे. नियमांचे पालन नागरिकांकडून केल्या जात नसून प्रशासन सुद्धा याबाबत हतबल ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे चार व ग्रामीण रुग्णालयाचा एक असे पाच डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.जळगाव तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या २७९ झाली आहे. आता कंटेनमेंट झोन करणे बंद झाले. तसेच ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तो भाग दररोज सॅनीटाईस करणे व त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत नाही. सध्या ८० अॅक्टीव्ह रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत.त्यांना कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याने ते कोरोनावर मात करून घरी परततील अशी आशा आहे. परंतु दररोज वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हा तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
स्वॅब घेतल्यानंतर संदिग्ध रुग्णांचा अनेकांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:17 PM