लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. जलजन्य आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलशुद्धी उपकरण लावणे आवश्यक असताना अनेक उपाहारगृहामध्ये ते बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. शहरातील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही, या पाण्याचा व्यावसायिक वापर करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल, त्यावेळी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्यपदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिले जाते. अनेकदा या पाण्यात जंतू आढळून येतात. या हॉटेलमध्ये बनणारे पदार्थ हे चमचमित आणि तेलकट असतात. यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन पिण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. काही उपाहारगृहात विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सदर विहिरीचे पाणी निजर्तंुकीकरणाअभावी अशुद्ध असते. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगूनही ते पाणी पिण्यास वापरले जाते. तपासणी मोहीम सुरू करण्याची गरजतालुक्यातील उपाहारगृहात हीच परिस्थिती आहे. उच्च प्रतिच्या हॉटेलमध्ये शुद्ध पाण्याची बाटली विकली जाते. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये शुद्ध पाणी असतेच असे नाही. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी विकत घेऊन पाणी प्यावे, यासाठी म्हणून असे पाणी वापरले जात असल्याचेही वास्तव आहे. जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आरोग्याला धोका असतो. यातूनच जलजन्य, साथीच्या आजाराला सुरुवात होऊन, काही जीव गमावण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद प्रशासनाने पिण्याचे पाणी तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी; आरोग्य धोक्यात
By admin | Published: July 03, 2017 12:42 AM