लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणातंर्गत नालीचे खोदकाम करताना बुधवारी पुन्हा कंत्राटदाराने पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फोडली. त्यामुळे नांदुरा रोडवर पाण्याचा मोठा अपव्यय झाला. तर मागील मंगळवारी फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती न झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणाचाच भाग असलेल्या नाल्यांच्या निर्मितीसाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम केले जात आहे. पालिकेची पाईपलाईन शिफ्टींग न करताच नालीचे खोदकाम आणि बांधकाम करण्यात येत असल्याने, ठिकठिकाणी पालिकेची पाईपलाईन फुटत आहे. बाळापूर फैलानंतर मागील आठवड्यात नांदुरा रोडवर पाईपलाईन फुटली होती. त्यानंतर मंगळवारी चौथ्यांदा नगर पालिकेला पाण्याचा पुरवठा करणारी चार इंची पाईपलाईन फुटली. तसेच नांदुरा रोडवरही पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे.
पाईपलाईन दुरूस्तीला विलंब!
शहरातील पाईपलाईन फुटल्यानंतर या पाईपलाईनच्या दुरूस्तीबाबत संबंधितांकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. नांदुरा रोड, बाळापूर रोड आणि नगर पालिकेच्या व्यापारी गाळ्याजवळील पाईपलाईनची दुरूस्ती न करण्यात आल्याने, पाण्याचा अपव्यय होत आहे.
शहराचा पाणी पुरवठा प्रभावित!
तांत्रिक बिघाड आणि वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने, खामगाव शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. सामान्य परिस्थितीत खामगाव शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र, पाईपलाईन लिकेजमुळे तब्बल १४-१५ दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.