जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी दररोज पाचच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे हे प्रमाणही आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ७१५ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली शहरातील तीन, खामगावातील एक, देऊळगाव राजा तालुक्यातील सावंगी येथील एकाचा समावेश आहे. तर चार जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ३९ हजार ५९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांपैकी ८६ हजार ५६० जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१८१९ अहवालांची प्रतीक्षा--
संदिग्धांचे तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालांपैकी १ हजार ८१९ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार २६४ झाली असून यापैकी ३२ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील ६७२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.