कोरोना संक्रमणाच्या उद्रेकाला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले आहे. आता मात्र तालुक्यात दुप्पट वेगाने रुग्ण वाढू लागले आहेत. संपूर्ण वर्षभरात ९५६ रुग्ण तालुक्यात आतापर्यंत आढळले आहेत. यातील ६५० रुग्ण १ फेब्रुवारी अगोदरचे आहेत. मागील केवळ दीड महिन्यातच ३०० रुग्ण वाढले आहेत. यावरून या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात येत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक कोरोनाचे नियम पाळायला तयार नाहीत, तर दुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी वाढत्या रुग्णसंख्येने हैराण झाले आहेत. कमी मनुष्यबळ तसेच जनतेचा अल्प प्रतिसाद यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी असलेल्या यंत्रणेला त्रस्त केले आहे. त्यातच आज लोणार तालुक्यात एकाच दिवशी २७ कोरोनाबाधित आढळल्यामुळे तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या थेट १२६ पर्यंत पोहोचली आहे. या कोरोना संक्रमण काळात एवढे सक्रिय रुग्ण असण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्व आरोग्य यंत्रणा 'अलर्ट मोडवर’ आल्याचे दिसत आहे.
खबरदारी घेण्याची गरज
मागील एक महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा धक्कादायकरीत्या वाढत असल्याने जनतेने आता तरी कोरोनाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या महिनाभरात रुग्णसंख्या अजून वाढू शकते. ज्यामुळे जनतेला अजून कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.
नियमांकडे दुर्लक्ष
अवघ्या दीड महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. प्रत्येकाने वेळीच सावध होण्याची गरज आहे. गतवेळी सर्वच जण सतर्क होते, नियम पाळले गेले. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. पण आता मात्र कोरोनाची भीतीच उरली नाही, असे चित्र आहे. त्यामुळे अनेक जण विनामास्कचे बाहेर पडत आहेत, दुकानांवर गर्दी करत आहेत. वाढत्या नियमाच्या उल्लंघनामुळे कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच आहे.