- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे गत दहा दिवसांपासून लालपरीची चाके थांबलेली आहेत. परिणामी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला जवळपास चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आणखी १५ एप्रिलपर्यंत सेवा बंद राहणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून एसटी महामंडाची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. गत दहा दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी बस डेपोतच असल्याने महामंडळाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. बुलडाणा विभागाचे दररोजचे उत्पन्न ३५ ते ४० लाख आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून सेवा बंद असल्याने नुकसान जवळपाच ४ कोटींच्या घरात गेले आहे. नादुरुस्त बसेस व इतर कारणांमुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खूप मोठी आर्थिक झळ बसली आहे. हे सर्व वास्तव असले तरी सद्य:स्थितीत प्रसार रोखण्यासाठी सेवा बंद ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. कारण एसटी बसमध्ये सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळणे शक्य नाही. एसटी बस सुरू झाल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता आर्थिक झळ सोसल्याशिवाय शासन तथा एसटी महामंडळाकडे कोणताही पर्याय सध्या उरलेला नाही.
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडल्यास सोशल डिस्टंसिंग ठेवावे. एसटी बसमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नाही. त्यामुळे बुलडाणा विभागातील ४३० शेड्यूल पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक बुलडाणा.