धामणगांव धाड : दिवसेंदिवस जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात शनिवार, रविवार कडक लाॅकडाॅऊन केले आहे, तसेच नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना खीळ बसली आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सध्या हॉटेल, पानटपरी चालकांना व्यवसाय करणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. धामणगावसह मासरूळ, तराडखेड, गुम्मी, धाड, डोमरूळ, टाकळी परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडी बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करीत असतात. मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.