धामणगाव धाड : मार्च महिन्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षापासून माठ विक्रीत घट झाली असल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात असल्याचे चित्र आहे.
गेल्या महिनाभरपासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. या सर्व परिस्थितीचा फटका सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना बसत आहे. ग्रामीण भागात कुंभार पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार करतात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र, मागील वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या विविध इलेक्ट्राॅनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रीज व संबंधित इलेक्ट्राॅनिक्स वस्तू उपलब्ध करून देत असल्याने व बाजारात कोरोनाच्या भीतीने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून मिळणाऱ्या पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने माठाच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील कुंभार बांधवांचा व्यवसाय आर्थिक तोट्यात आला आहे.