कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर घातलेल्या कडक निर्बंधांमुळे उत्पादक शेतकऱ्यांना कलिंगडाची बाजारात बेभाव विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धामणगांवसह परिसरातील कलिंगड उत्पादक शेतकरी करित आहे. डिसेंबर महिन्यात लागवड केलेल्या कलिंगड पिकांवर केलेला बी - बियाणे ओषधी, खते आदी हा एकरी खर्च जवळपास पन्नास हजार रुपये झालेला आहे. मात्र उद्भवलेल्या परिस्थितीमूळे हा खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाच्या संकटाची मालिका सूरू असून बाजारात शुकशुकाट आहे. अंतरजिल्ह्यात जाणारी वाहने नागपूर, अकोला, अमरावती, औरगांबाद जळगांव आदी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने गाड्या बंद आहेत. परिणामी मिळेल त्या भावाने माल गावातच प्रतिकिलो पाच ते सहा रुपये प्रमाणे विकावा लागत आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कोरोनाच्या सावटामुळे आम्ही लागवड केलेल्या कलिंगडाची बाजारात बेभाव विक्री करावी लागत असल्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघतो की नाही असा प्रश्न पडला आहे. शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे.
गजानन पायघन, कलिंगड उत्पादक शेतकरी धामणगांव धाड.