बुलडाणा: राज्यासह देशपातळीवर प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रा कोरोनाचे संभाव्य संकट पाहता पुढे ढकलण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही ‘नो गॅदरींग’चे संकते दिले असून त्यातंर्गतच राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पाच मार्च रोजी घेतलेल्या व्हीसीमध्ये हा मुद्दा चर्चिल्या गेला आहे. त्यामुळे सहा मार्च पासून सुरू होणारी सैलानी यात्रा ही पुढे ढकलल्या जाण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही सैलानी बाबा ट्रस्टचे पदाधिकारी, पिंपळगाव सराईचे सरपंच व जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी यांची बैठक झाली असून त्यात अनुषंगीक विषयावर चर्चा झाली आहे. अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे सैलानी यात्रा ही कोरोना व्हायर संक्रमणाची शक्यता पाहता पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. सैलानी यात्रा ही महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातही प्रसिद्ध असून येथे या सर्व भागातून जवळपास आठ लाखाच्यावर भाविक दरवर्षी यात्रेत येत असतात. देशात कोरोनाचे २८ संशयीत रुग्ण पाहता कोरोनाचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीकोणातून केंद्र सरकारकडूनही प्रयत्न केले जात असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पाच मार्च रोजी व्हीसीद्वारे जिल्हानिहाय आरोग्य यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात सैलानी यात्रा ही प्रसंगी रद्द किंवा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाव न घेण्याच्या अटीवर सुत्रांनी व्यक्त केली आहे. प्रशासकीय पातळीवर प्रसंगी सहा मार्च रोजी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आंध्र, तेलंगणाच्या सीएमओंना पत्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे यासंदर्भात आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीएमओही अनुषंगीक पत्र लवकरच अधिकृतस्तरावर विभागीय आयुक्तांची परवानगी घेऊन दिल्या जाणार असल्याचे संकेत आहेत. सध्या सैलानी यात्रेत जवळपास १५ ते २० हजार भाविक असून त्यांना मुळ गावी परत पाठविण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहविभागाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. एन्ट्रन्स पॉईंटवर बॅनर लावण्याबाबत चर्चा सैलानी यात्रेसाठी जालना रेल्वेस्थानक, मलकापूर, शेगाव, नांदुरा या जिल्ह्यातील एन्ट्रन्स पाईंटवरील रेल्वेस्थानकांवर अनुषंगीक बॅनर लावण्याचीही तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.