गत दोन आठवड्यांपासून जानेफळ येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड टेस्ट तसेच आर.टी.पी.सी.आर. चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. दररोज व्यापारी, पतसंस्था व बँक कर्मचारी, लक्षणे दिसणारे गावातील नागरिक तथा महिला इत्यादींची स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी केली जात आहे. परंतु, आरोग्य विभाग वगळता, याविषयी प्रशासनातील इतर विभागांचे मात्र दुर्लक्ष दिसत आहे. कोरोनाच्या भीतीने जबाबदार अधिकारी तथा कर्मचारीसुद्धा गावात येण्याचे टाळत आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचा प्रशासनावर वचक नसल्याने त्यांच्या आदेशाची कुठलीच अंमलबजावणी होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. जानेफळ येथे गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना त्याचा फैलाव होऊ नये, प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या रूटमार्चचे फोटोसेशन करून घेण्यातच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी धन्यता मानत असल्याचे दिसत आहे.
रूटमार्च फोटोसेशनपुरतेच
तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्या नेतृत्वाखाली २५ फेब्रुवारी रोजी जानेफळ येथे रूटमार्च काढण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निघालेला हा रुटमार्च केवळ फोटोसेशनपुरताच मर्यादित ठरला. त्यानंतर मात्र अधिकारी, कर्मचारी फिरकलेसुद्धा नाही. जानेफळ येथे दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून येत असताना यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी तातडीने जानेफळ येथे पोहोचणे गरजेचे असताना त्यांनी मात्र त्यानंतर फिरकूनसुद्धा पाहिले नाही.
वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय?
जानेफळ हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला असताना अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. जानेफळ येथील जनता मात्र सध्या रामभरोसेच झाली असून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.