लोकमत न्युज नेटवर्क
बुलडाणा : घराच्या बाहेरही पाऊल ठेवलेले नसताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे प्रकार बुलडाण्यात घडले आहेत. तरुण मंडळी विनाकारण घराबाहेर फिरते. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना कोरोना संसर्गाला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन, सॅनिटायझरचा वापर या बाबीही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, कामानिमित्त आणि काम नसताना घराबाहेर पडणारी तरुण मंडळी ‘मला काही होत नाही’ या अविर्भावात प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाही. घरी गेल्यानंतरही आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. परंतु, त्याचा फटका मात्र घरातील ज्येष्ठ मंडळी आणि बालकांना सहन करावा लागत आहे. यातून स्वत:चे कुटुंबच अडचणीत आणण्याचा प्रकार होत आहे. तेव्हा नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी
घरात जाण्यापूर्वी स्नान करावे, शक्यतो सर्व कपडे त्याच दिवशी भिजवून धुण्यासाठी द्यावेत. मोबाईल, बेल्ट, पॉकेट सॅनिटाईझ करून घ्यावे.
घरामध्ये वावरत असताना शक्यतो मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून काही अंतर ठेवूनच संवाद साधावा. घरीदेखील मास्क वापरावा.
बाहेरून घरी आल्यानंतर वाफ घ्यावी. सॅनिटायझरच्या साहाय्याने हात स्वच्छ धुवावेत. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
ही पहा उदाहरणे
खामगाव शहरातील तापडिया नगर भागातील एका कुटुंबातील एक शिक्षक कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्याच कुटुंबातील मुलगा कोरोनाबाधित आढळून आला. विशेष म्हणजे मुलगा घराबाहेर पडलेला नाही. तरीही त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्रकार घडला आहे. असे अनेक रुग्ण शहरात आहेत. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
सावजी ले-आऊट भागातही एका बालिकेला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे शाळा बंद आहेत आणि ही बालिका घराबाहेर पडलेली नसताना तिला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोनाबाधित झाल्यानंतर ही बालिका पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे घराबाहेर फिरणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, थोडाही ताप अथवा इतर लक्षणे आढळून आल्यास आरटीपीसीआर तपासणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
- डॉ. प्रशांत पाटील, काेविड प्रयाेगशाळा प्रमुख, बुलडाणा