- अनिल गोठीलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : गेल्या काळात शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक होती. तसेच तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट उद्भवल्यास लहान मुलांना त्याची बाधा होण्याची शक्यता असतानाच आतापर्यंत मलकापूर शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ४०५ बालकांचा समावेश असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.गतवर्षापासून उद्भवलेल्या कोरोना महामारीची पहिली लाट वयोवृद्धांना त्रासदायक ठरली. तर दुसरी लाट असताना कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या व विविध औषधी, उपचार सामग्रीचा तुटवडा या कारणांमुळे खूपच भयावह ठरली, परंतु शासनाने योग्यवेळी विविध निर्बंध व उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच तज्ज्ञांच्या मते काळजी घेतली नाही तर तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता आहे. त्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे. उपजिल्हा रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार शहरातील कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ११४ तर दुसऱ्या लाटेत २९१ अशा एकूण ४०५ बालकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात सतर्क राहून लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मुलांना घराबाहेर शक्यतो पाठविण्याचे टाळावे.
मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका हा वयोवृद्धांना जास्त पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या लाटेची परिस्थिती पाहता यामध्ये तरुणांना सुद्धा जास्त प्रमाणावर संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच यामध्ये लहान बालकांची संख्या पाहता नागरिकांना योग्य ते उपाययोजना व काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. पुरुषोत्तम पाटील, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मलकापूर