राष्ट्रीय जंतुनाशक मोहिमेला सुरुवात
लोणार : तालुक्यातील टिटवी येथे राष्ट्रीय जंतुनाशक मोहीम राबविण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्या गोदावरी कोकाटे व सरपंच भगवानराव कोकाटे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी बालकांना जंतुनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
किसान ब्रिगेडचा बीबी येथे मुक्काम
बीबी : किसान ब्रिगेडच्या जागृत सायकल यात्रेचा प्रारंभ ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सिंदखेड राजा येथून होत आहे. या यात्रेचा मुक्काम सायंकाळी लोणार तालुक्यातील बीबी येथे राहणार आहे, तर समारोप अकोला जिल्ह्यात १८ मार्च रोजी होणार आहे.
लोणार येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
लोणार : येथील बनमेरू विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन रविवारी साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान दिनाचा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला होता.
उज्ज्वला योजनेच्या महिला त्रस्त
बुलडाणा : सिलिंडरच्या दरात पुन्हा २५ रुपयांची वाढ झाल्याने उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या महिला त्रस्त झाल्या आहेत. भाव वाढल्यापासून अनेक महिलांनी गॅस भरूनच आणला नाही.
तीन हजार ६१५ बेड उपलब्ध
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला पाॅझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता तीनशे पार गेलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील बेडची संख्याही वाढविण्यात आलेली आहे. सध्या तीन हजार ६१५ बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
रुग्ण वाढल्याने वरवंड येथे लाॅकडाऊन
बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथे १७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतने येथे स्वत:हून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वरवंड येथे वारंवार रुग्ण सापडत आहेत.
सुलतानपूर येथे अवैध गुटखा विक्री वाढली
सुलतानपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची अंमलबजावणी करण्यात सध्या पोलीस प्रशासन व्यस्त आहे. याचा फायदा गुटखा विक्रेते उचलत आहेत. सुलतानपूर परिसरात अवैध गुटखा विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. किराणा दुकानावरही खुलेआम गुटखा मिळत आहे.
५० हजार रुपयांची सोन्याची पोत केली परत
डोणगाव : लोणी गवळी येथील देवानंद सरकटे हे लोणी गवळी ते मेहकर प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्या वाहनामध्ये एका महिला प्रवाशाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हरवली होती. ही पोत देवानंद सरकटे यांना मिळताच त्यांनी त्या महिलेशी संपर्क साधून ती पोत परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून दिले. देवानंद सरकटे यांचा प्रामाणिकपणा पाहून लोणी गवळी येथील काही नागरिकांनी सोमवारी त्यांचा सत्कार केला. इतर युवकांनी सरकटे यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
पोलीस वसाहतीची दुरवस्था
देऊळगाव मही : अंढेरा येथील इंग्रजकालीन पोलीस वसाहतीची दुरवस्था झालेली आहे. या वसाहतीमध्ये सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असते. त्यामुळे येथे नवीन वसाहत निर्माण करणे आवश्यक आहे.
शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न
दुसरबीड : खासगी शिक्षण संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या माध्यमिक विद्यालयातील डी.एड. पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनश्रेणी, निवडश्रेणी, वरिष्ठश्रेणी, आदी बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.