कोरोनाने जिल्ह्यासह लोणार तालुक्यात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस भर पडत आहे. तालुक्यात एकाच ठिकाणी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली, तर तालुक्यात एकाच रुग्णालयात रुग्णावर उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पूर्वीचे जुने बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र बांधलेले असून गत काही दिवसांपूर्वी शासनाने नागरिकांचे आरोग्य आबाधित रहावे म्हणून येवती, खळेगाव, तांबोळा इतर ठिकाणीसुद्धा लाखो रुपये खर्च करून मोठ-मोठ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारती बांधलेल्या आहेत. सध्या त्या शोभेच्या वास्तु म्हणून उभ्या आहेत. दरम्यान, तालुक्यात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती आहेत, त्या परिसरातील रुग्णावर किंवा क्वारंटाईन रुग्णांवर तेथे प्राथमिक उपचार सुरू करावे, त्यांच्या देखरेखीसाठी गावातील जिल्हा परिषद शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशा सेविका व आरोग्य विभागाचा एक कर्मचारी औषध उपचारासाठी ठेवावा. जेणेकरून तालुक्यातील रुग्णांची व त्यांचे नातेवाईकांची धावपळ होणार नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे यांनी केली आहे.
आरोग्य उपकेंद्रात कोरोना रुग्णावर उपचार करण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:43 AM