बुलडाणा : जिल्ह्यात सध्या दिवसाकाठी सरासरी दीड हजार कोरोना तपासण्या होत आहेत. गत आठवड्यात सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये अवघे ४१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांना एकीकडे दिलासा मिळाला आहे; मात्र कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या कमी झाली, की कोरोना चाचण्या कमी झाल्या? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता, गेल्या आठवड्यापासून या आलेखाने तळ गाठल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर गावे बाधित झाली होती. त्यामुळे
रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले होते. परिणामी गावांमध्येच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार कक्षदेखील सुरू करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रभावी उपाययोजनांमुळे गावे लवकर कोरोनामुक्त होत
होती. जवळपास निम्म्या गावांनी कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नसल्याचेही समोर आले आहे. आता संपूर्ण तालुक्यातच शून्य पॉझिटिव्ह संख्या समोर येत असल्याची समाधानाची बाब आहे. परंतु यामध्ये कोरोना चाचण्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना तपासण्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या घटली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गत दहा दिवसांतील चित्र
दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह
८ ऑगस्ट १८६३ ७
९ ऑगस्ट ९५३ ६
१० ऑगस्ट १४८९ ६
११ ऑगस्ट २५०८ ६
१२ ऑगस्ट १९९७ ७
१३ ऑगस्ट २५२७ ०
१४ ऑगस्ट १८७१ ३
१५ ऑगस्ट २४८६ ०
१६ ऑगस्ट ८०८ २
१८ ऑगस्ट १३५३ ५
एकूण कोरोना पॉझिटिव्ह: ८७३६१
कोरोनामुक्त: ८६६४५
एकूण मृत्यू: ६७२
सक्रिय रुग्ण: ३५
दहा दिवसांत १७ हजार ८५४ चाचण्या
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांमध्ये १६ हजार ८५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, आणखी चाचण्या वाढविण्याची गरज आहे. निर्बंध शिथिल झाल्याने आठवडी बाजार, बसस्थानक यासह इतर सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणीही कोरोना चाचण्या करणे गरजेचे आहे.
सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद
आतापर्यंत सर्वाधिक कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ही ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये झालेली आहे. गत दहा दिवसांमध्ये झालेल्या एकूण चाचण्यांच्या ०.२३ टक्केच रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यातही १५ व १३ ऑगस्ट रोजी तर शून्य रुग्णसंख्या आहे.