गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर याठिकाणी कार्यरत आरोग्यसेविका आणि आरोग्य सेवक यांनी रुईखेड गावात अद्यापही भेट देऊन सर्वेक्षण केले नाही, तर या गावात आजवर कोरोनाच्या रॅपिड किंवा आरटीपीसीआर चाचण्यासुद्धा घेण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभाराने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. आरोग्य प्रशासन एकीकडे कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवीत आहे. मात्र, या गावात आरोग्य विभागाचा कुठलाही कर्मचारी गावात फिरून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करीत नाही. उपकेंद्रातील येणाऱ्या गावांचा अहवाल एका ठिकाणी बसून कागदोपत्री वरिष्ठ कार्यालयात पाठविला जातो. अशा परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव कसा कमी होईल हा प्रश्न आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून कोरोनाच्या चाचण्या आणि नागरिकांना लसीकरण करण्यावर भर देत, पाॅझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाइन ठेवत इतर नागरिकांना लागण होण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत रायपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. थोरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांना रुईखेड मायंबा याठिकाणी रुग्ण बाधित आहे, की नाही याची माहिती नाही, तर आरोग्य सेवक राठोड यांना माहिती विचारली असता त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे याची माहिती तर नाहीच; परंतु कोरोनाच्या चाचण्या आणि कोविडचे किती जणांना लसीकरण करण्यात आले याचीही माहिती नसल्याचे कळले.
गावात कुणी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत, याबाबत आरोग्य सेवकाने माहिती दिली नाही, तर गावात साधारण एकदाच कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
विष्णू उगले, सरपंच, रुईखेड मायंबा.