या महिला सरपंचाने आपल्या गावासह, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जनजागृती केली आहे. गटविकास अधिकारी, ठाणेदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या अभियानास भेट देऊन महिला सरपंच ताई जाधव यांचे कौतुकसुद्धा केले आहे. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन गावात पंचसूत्री राबविली आहे. घरोघरी जाऊन मास्क वाटणे, साबण, सॅनिटायझर वाटप करणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गरजू लोकांना अन्नधान्य, किराणा साहित्य वाटप करणे, गावात धूळफवारणी, सॅनिटायझर, जंतुनाशक फवारणी करणे, स्वच्छता अभियान राबविणे यांसह विविध संदेश देत गावात जनजागृती केली. विविध संदेश देत मेहकर शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, पंचायत समिती, पोलीस ठाणे, महसूल उपविभागीय कार्यालय या गर्दीच्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबतही जनजागृती केली आहे. तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य रस्त्यावर ही जनजागृती केली आहे.
दाेन्ही लाटांना राेखले वेशीवरच
विविध जनजागृती उपक्रमांतून महिला सरपंच ताई गजानन जाधव या आपल्या गावासह जिल्हापातळीवर अग्रेसर असल्यामुळे त्यांचा नावलौकिक झाला आहे. कोरोनाची पहिली लाट व दुसरी लाट रोखण्यास महिला सरपंच यशस्वी झाल्या आहेत, तर आता कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना आखत गाववेशीवर जागता पहारा देत आहेत. त्यामुळे तिसरी लाटसुद्धा वेशीवरच थांबविणार आहेत.