लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नऊ ते १२ वी ला शिकविणाऱ्या जिल्ह्यातील ६,०८४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आतापर्यंत करण्यात आली असून यापैकी १८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ९ ते १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १६ हजार ५३४ आहे. दरम्यान, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची संख्या ६७५ आहे. १७ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील शिक्षकांची शाळा सुरू होण्याचे संकेत मिळताच युद्धपातळीवर काेरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व नॉन टिचींग स्टाफचा समावेश आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने प्रतीबंधीत क्षेत्र वगळता अन्य भागातील या शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून पालकांची लेखी संमती गेवूनच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासोबतच वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था ही शारीरिक अंतराचे नियम पालन करूनच करण्यात यावी, अशाही सुचना देण्यात आलेल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसले व नावानीशी त्याची बैठक व्यवस्था होईल, अशी सुविधा करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले गेले आहे. सोबतच शाळेमध्ये दर्शनी भागात शारीरिक अंतर पाळण्यासोबतच, मास्कचा वापर करण्याबाबत सुचना दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील ६०८४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली असली तरी बाहेर गावी असलेल्या ७३९ जणांची अद्याप चाचणी होवू शकलेली नाही. तसेच मोताळा व खामगाव तालुक्याची कोरोना चाचणी संदर्भातील माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
थुंकण्यावरील प्रतिबंधाची कडक अंमलबजावणीशाळेच्या परिसरात थुंकण्यावरील बंदीच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. यासोबतच शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरीता किमान सहा फुट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरीता विशिष्ट चिन्हे जसे की चौकोन, वर्तुळ आखून ठेवलेले असावे. तसेच शाळेत जाण्या-येण्यासाठीचे दोन्ही मार्ग वेगवेगळे असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.