लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तरीही अनेक नागरिकांची शहरात भटकंती सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्याचा उपाय शहर पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामध्ये शनिवारी १२५ जणांची चाचणी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या उपाययोजना लागू केल्या. या अंतर्गत केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. सकाळी शहरात सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांकडून रस्त्यांवर फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.शनिवारी नांदुरा रोडवरील गांधी गार्डनसमोर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड टेस्ट केली. त्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी डॉ.अवंती गवई, डॉ.संजय चव्हाण, डॉ.अमोल अढाव, डॉ.जावेद खान, गजानन निमकर्डे यांनी नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर सर्वांचे नाव पत्ता, मोबाइल नंबर व आधार नंबर घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. ही मोहीम शहर पोलीस पो.स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी राबविली.
खामगावात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:43 PM