लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील ४ टक्के नागरिकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यापैकी १२ हजार १३६ संदिग्ध कोराेना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट (प्रोग्रेसिव्ह) सध्या १२ टक्क्यांवर आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या घटनेला येत्या २८ डिसेंबरला आठ महिने पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकंदर कोरोना चाचण्यांची माहिती घेतली असता हीबाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बुलडाण्यात सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा चर्चेत आला होता, तर घटनेचे गांभीर्य पाहता आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी यांनी तातडीने बुलडाणा जिल्ह्यास भेट देऊन आरोग्य यंत्रणेला सतर्क करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात जि्ल्ह्यात कोराेनाची लाट आली होती. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणाचा वेग वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत होती. याच कालावधीत नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात १,८३१ कोरोनाबाधित आढळून आले होते. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १२ हजार १३६ कोरोनाबाधित असून, १४६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ३५३ ॲक्टीव्ह रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लसीकरण प्रशिक्षण पूर्णजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गतच्या १६ संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठस्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भातील एक व्हीसीही संपलेल्या आठवड्याच्या प्रारंभी घेण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
दैनंदिन बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमीदररोज करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. रविवारी प्राप्त झालेल्या ९५९ अहवालांपैकी ४९ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्याचे प्रमाण पाहता दैनंदिन स्तरावर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण अवघे ५.१० टक्क्यांवर आले आहे. जे की डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी सहा टक्के होते. एक टक्क्याने त्यात घट झाली आहे.