कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने कोरोना व्हॅक्सिन लसीकरण सुरू केले आहे. मेहकर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथम कोरोनाचे लसीकरण करून घेतले. मेहकर तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य यंत्रणेसह शासकीय सेवेतील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. डोणगाव येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने २८ जानेवारी रोजी लस घेतली. त्यानंतर या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला. त्यानंतर या वैद्यकीय अधिकाऱ्याचा १८ फेब्रुवारी रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे. एकीकडे कोरोनाच्या सुरुवातीपासून या वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णसेवा दिली होती. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे लसीकरणासंदर्भात काहीसा संभ्रम निर्माण होत आहे.
कोट
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर शरीरात ॲन्टिबॉडीज तयार होता. दोन्ही डोस घेण्याच्या कालावधीत कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही संबंधितांनी मास्क वापरणे, नियमित हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर १५ दिवसांची शरीरात कोरोनाविरोधातील ॲन्टिबॉडीज तयार होता.
-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा