१३ मार्च रोजी बुलडाणा जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांच्या हस्ते कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. गोफने, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर गिते, पं.स. सदस्या शारदा सानप, गणेश आंबिलकर, उपसरपंच लताबाई सानप, गजानन सानप, प्रमोद सानप, पुंजाराम नांगरे उपस्थित होते.
जिल्ह्यात तसेच देऊळगाव राजा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती व येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गिते यांच्या प्रयत्नामुळे अंढेरा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पहिल्याच दिवशी २० जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत लस उपलब्ध असणार आहे. कोरोनाची लस घेतलेल्यांनी नियमित तोंडाला मास्क, नियमित सॅनिटायझरने हात धुणे, लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर गीते यांनी केले आहे. यावेळी डाॅ. सचिन सानप, डॉ. पूजा गांताडे, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेराचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.