मोताळा : आदर्श जि. प. शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरणाची जनजागृती २१ मार्च रोजी करण्यात आली. तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्या वतीने प्रत्येक गावात शिक्षकांकडून घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
आराेग्य विभागाने ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी २१ मार्च रोजी तहसीलदार गटशिक्षण अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. यासाठी चार-चार शिक्षकांचा चमू तयार करण्यात आला असून, त्यांनी कोरोना जनजागृती व डाटा एंट्रीचे काम सुरू केले आहे. बोराखेडी मुख्याध्यापक अनिल चव्हाण व तेथील शिक्षकांनी बोराखेडी गावात घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण हे महत्त्वाचे असून, यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, असे प्रबोधन करीत लसीकरणासाठी प्रवृत्त केले आहे. लसीकरण करून घेण्याचे काम सुरू आहे. जनजागृतीसाठी अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला चहाकर व अनिता धोरण यांनी सहकार्य केले.