मेहकर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या भोसा गाव कोरोना हॉटस्पॉट ठरत असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, तर २६ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य विभागासह भोसा या गावात एकच खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाच्यावतीने भोसा गावात दररोज रॅपिड कोरोना टेस्ट व आरटीपीसीआर कोरोना टेस्ट भोसा या गावात करण्यात येत आहे. दरम्यान, २८ मे रोजी भोसा
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव यांच्यावतीने सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोविड लसीकरण शिबिर जिल्हा परिषद शाळा भोसा
येथे आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरामध्ये १०० कोविड लसीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, भोसा या गावातील ग्रामस्थांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ५७ जणांनीच लस घेतली. त्यामुळे ४३ लसी परत करण्याची वेळ आली. भोसा या गावातील सर्व शिक्षक, आशासेविका, आंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जावून कोविड लसीकरणाबाबत ग्रामस्थांना माहिती देऊनही ग्रामस्थांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथे लसीकरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. एकीकडे कोविड लसीकरण केंद्रांसमोर लस घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागत असताना तासन् तास थांबून त्यांना लसही मिळत नाही. मात्र, भोसा या गावात लस उपलब्ध असताना नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. भोसा या गावात लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्यावतीने डॉ.मंगेश विडोळे, आरोग्यसेविका लता कडू, आरोग्यसेवक किशोर धोटे, तलाठी म्हस्के, विस्तार अधिकारी सोनुने, ग्रामसेवक पी. के. गवई, शिक्षक रा. का. जाधव, बा. रा. भगत, जयपुरे, तोंडे, इंगळे, देशमुख, शेळके, अंगणवाडीसेविका शारदा मुळे, शारदा डाखोरे, खुरदताई, सुनीता भोेंडगे, आशासेविका मोघाड आदी हजर होते.