धामणगाव बढे : मागील तीन दिवसांपूर्वी लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीसाठीचे सॉफ्टवेअर बदलण्यात आले आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात ४५ वयावरील व्यक्तींनाच आता कोरोना लसीकरणाची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना योद्धे लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
सुरूवातीला ४५ वर्षांच्या आतील आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट, शिक्षक, पत्रकार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यासह विविध शासकीय कर्मचारी यांना उपलब्ध असलेली लसीकरणाची सुविधा आता बंद झालेली आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. आधार कार्डशिवाय लसीकरणाची नोंदणी होत नसल्यामुळे ४५ वर्षाच्या आतील व्यक्तींना लस दिली जाऊ शकत नाही. धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारखेडे यांनी यास दुजोरा दिला आहे. यापूर्वी विविध घटकांसाठी सुरू असलेली वयामध्ये शिथिलता दिलेली लसीकरण मोहीम परत राबविण्यात यावी, अशी मागणी होते आहे. सध्या ४५ च्या आतील वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची सुद्धा लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकत नाही. पूर्वी या विविध घटकांनी लसीकरण मोहिमेत उत्साहात सहभाग घेतल्यामुळेच समाजात त्याचा सकारात्मक परिणाम होऊन लसीकरणाविषयी समाजात जागरूकता निर्माण झाली होती.